आमचं ओझं होतं.. मग आता सोबतीला ओझ्याची गाढवं आहेत का ? भाजपचा शिवसेनेला प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध सुरु झाले आहे. आज शिवसेनेनं सामना या त्यांच्या मुखपत्रातून भाजपवर बोचरी टीका केली. शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

शिवसेनेच्या टीकेला भाजपने जशासतसे उत्तर दिले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेला उत्तर दिले आहे. भाजपचं 30 वर्ष ओझं असेल… तर आता दोघांना सोबत घेतलं आहे ती ओझ्याची गाढवं आहेत का ? अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या टीकेचा समाचार घेतला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसाठी अजूनही दारे उघडी असल्याचे म्हटले होते.

शिवसेनेच्या अग्रलेखात काय म्हटलं आहे ?
भाजप म्हणजे ‘भारत जलाओ पार्टी’ अशी बोंब ठोकली होती ते रामविलास पासवान मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मोदींना खालच्या शब्दात टोले मारणारे नितीशकुमार हे बिहारमध्ये भाजपच्या टेकूवर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणी कोणावर बोलायचे ? भाजपचे नेते देशाच्या प्रश्नावर, जनतेच्या मागण्यांवर मूग गिळून बसले आहे. पण भावनिक विषयांवर तोंड फाटेपर्यंत बोलत आहेत. काँग्रेसमधून टनावर माणसं फोडून आपल्या पक्षात घ्यायची आणि सत्ता मिळवायची हे ज्यांना चालते त्यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले अशी वक्तव्य करु नयेत.

देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी 2019 मध्ये शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करुन घ्यावी, असे शिवसेनेने स्पष्ट केले. आपल्यात आता कोणतेही नाते उतरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले, असे म्हणत भाजपसोबत असलंलं नातंही संपुष्टात आणल्याचे सूतोवाच शिवसेनेने केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/