‘हा उपग्रह नक्कीच RSS चा असणार !’ BJP आमदाराला फेक फोटोमुळे नेटकर्‍यांनी केलं ‘ट्रोल’

पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातून दीप जलाओ कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक अवकाशातून टिपलेला एक फोटो ट्विट करून विरोधकांवर टीका केली. पण, यावरूनच ते नेटकर्‍यांच्या रडावर आले. हा फेक फोटो असल्याचे निर्दशनास आणून देत नेटकर्‍यांनी भातखळकरांना ट्रोल केले आहे

काल रात्री नऊ वाजता देशभरातील नागरिकांनी घरातील लाईट बंद करून मेणबत्त्या, दिवे पेटवले होते. त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्हाट्सअपवर व्हायरल झालेला एक फोटो ट्विट केला. त्याचबरोबर हसणार्‍यांचे दात घशात घालत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या अंधकारात आशेचा दिवा प्रज्वलित केला. कोरोना संकटाच्या विरोधात देश एकजूट होऊन उभा राहिला. हे पहा अवकाशातून उपग्रहाने टिपलेले छायाचित्र,असे सांगत भातखळकर यांनी विरोधकांना सुनावले होते. मात्र, हा फोटो फेक असल्याचेही नासाने म्हटले आहे.

तोच फोटो भातखळकर यांनी ट्विट केला. या फोटोवरून नेटकर्‍यांनी भातखळकर यांना ट्रोल केले. सर, आमदार आहात आपण. ते पण गौरवास्पद परंपरा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे. जरा संवेदनशीलपणे वागा की साहेब, असे आशिष मेटे यांनी या ट्विटवर म्हटले आहे. नासाने हा फोटो फेक असल्याचा खुलासा बर्‍याच पूर्वी केला आहे, नासापेक्षा तुम्ही मोठे आहात का?, असा प्रश्न प्रतिक पाटील यांनी विचारला आहे. तर हा उपग्रह आरएसएसचा नक्कीच असणार असे एका नेटकर्‍यांने म्हटले आहे.