साध्वीच्या वक्तव्यावरून ‘या’ नेत्याचा फेसबुक पोस्ट करून भाजपला घरचा आहेर

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपच्या एका नेत्याने घरचा आहेर दिला आहे. अमरावतीचे भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी फेसबुक पोस्ट लिहीली असून त्यात भाजपने साध्वीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

शहिद हेमंत करकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधानं करत साध्वी प्रज्ञासिंह यांनी काल त्यासंदर्भात माफी मागितली. परंतु त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. याप्रकरणावरून सुनील देशमुख यांनी साध्वी प्रज्ञासिंहविरोधात एक पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. त्यात पक्षाने साध्वींच्या वक्तव्याची दखल घेऊन पक्षाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

काय म्हटले आहे फेसबुक पोस्टमध्ये –
“आपले जीवन देशासाठी अर्पण करणाऱ्या आणि २६/११ च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य स्विकारलेल्या स्व.हेमंत करकरे यांच्या बाबत साध्वी प्रज्ञासिंग यांचे आजचे वक्तव्य अतिशय निंदाजनक आहे.पक्षानी या निंदनीय वक्तव्याची गंभीर नोंद घेऊन तिच्यावर कठोर कारवाई करून त्यांना या देशाच्या जनतेला विनाशर्त माफी मागायची कारवाई करायला हवी.”

काय म्हणाल्या होत्या साध्वी
माझ्या शापामुळे हेमंत करकरे यांचा सर्वनाश झाला. ज्या दिवशी मी गेले होते. त्याचं सुतक लागलं होतं. आणि ठिक सव्वा महिन्याने ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली त्या दिवशी त्याचा अंत झाला.