गेल्या वर्षभरात राज्य सरकारची वाझेंची पुर्नस्थापना ही प्राथमिकता होती, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. राज्यात बेड्स, रेमडेसिवीर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. याचा फटका सर्वसामान्यांना होत असून मृतांची संख्या वाढत आहे. यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीसह इतर राज्यांवर टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षी कोरोना जगाला नवीन होता. सर्वांना तयारी करावी लागली. पण आता गेल्या वर्षभरात राज्यांनी काय तयारी केली. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर्स, बेड्स, हॉस्पिटल ही राज्य सरकारची प्राथमिकता नव्हती तर वाझेची पुर्नस्थापना ही होती, असा आरोप ठाकरे सरकारवर केला आहे.

पोलिस दलातून निलंबित करण्यात आलेल्या सचिन वाझेला कोरोना काळात राज्य सरकारने पुन्हा सेवेत घेतले. यानंतर मुंबईत आढळलेले स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण समोर आले. एवढेच नाहीत तर 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. सचिन वाझेला अटक करण्यात आल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.