भाजप, शिवसेनेच्या आमदारांची सभागृहात ‘हाणामारी’, ‘हे’ दिग्गज धावले मदतीला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्य पहिल्या दिवशी (सोमवारी दि 16 डिसेंबर) भाजपनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर वादळी चर्चा झाली आणि सभागृहाचं कामकाज बंद करण्यात आलं. यानंतर दुसऱ्या दिवशीही म्हणजेच आज (दि 17 डिसेंबर) भाजप आणि सेनेच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली आणि सभागृहात मोठा गोंधळ झाला. यानंतर पुन्हा कामकाज तहकूब करण्यात आलं.

शेतकऱ्यांना अवकाळी ग्रस्त मदत मिळेपर्यंत कामकाज स्थगित करावं अशी मागणी भाजपनं केली होती. यावर चर्चा सुरु असतानाच शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात हाणामारी झाली. यानंतर आशिष शेलार, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करत त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. यानंतर कामकाज 30 मिनिटे तहकूब करण्यात आलं.

यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात चुकीचं घडलं आहे. एकमेकांच्या अंगावार जाण्याचा कोणालाच अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकवणं चुकीचं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो.” असं सागंत कामाला पुन्हा सुरुवात झाली होती. दरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 25 हजार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. जोपर्यंत मदत दिली जात नाही तोपर्यंत कामकाज स्थगित करावे असे म्हणत ते आक्रमक झाले होते.

दरम्यान यावर बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले, “सत्तेत असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदत का दिली नाही? महाराष्ट्राचा पैसा केंद्राला का परत पाठवला ? विरोधकांना आज शेतकऱ्यांना पुळका आला आहे. तुमचा पुळका नाटकी आहे हे जनतेला माहिती आहे. आम्ही पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांना मदत देणार.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.