युतीत काही जागांवरून वाटाघाटी ! लवकरच ठरणार जागावाटपांचा फॉर्म्युला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगमी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणे भाजपा-शिवसेना युती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचा जागा वाटपांचा फॉर्म्युला कसा असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. येत्या दहा दिवसांत युतीच्या जागावाटपांचा फॉर्म्युला ठरेल असे खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे.

2014 ची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढविली होती. त्यातल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. पण काही जगांवरून दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचे काय करायचे हा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज गणेश चतुर्थी निमित्ताने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सोलापूर येथे महाजनादेश यात्रेची सांगता झाली. त्यामुळे आता जगावाटपांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, काल सोलापूर येथे झालेल्या सभेत अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा-शिवसेना युतीला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे युती होणार हे निश्चित झाले आहे.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असून भाजपने स्वबळावर निवडणूक लढवल्यास स्पष्ट बहुमत मिळेल असे सर्व्हेमध्ये स्पष्ट झाल्याने भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, अमित शहा यांनी सोलापूरमध्ये युतीला पुन्हा संधी देण्याचे आवाहन केल्याने या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त