काँग्रेसचा थेट भाजपावर हल्लाबोल, म्हणालं – ‘BJP करतेय चिनी अ‍ॅपचा वापर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लडाखमधील भारत-चीन सीमेवर नियमांचे उल्लंघन करुन चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये 20 भारतीय जवान शहिद झाले होते. यानंतर चीनविरोधात देशात संतापाची लाट आली. केंद्र सरकारने चिनची कोंडी करण्यासाठी चिनी अॅपवर बंदी घातली. बंदी घातलेले अॅप भाजप राजरोस वापरत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करुन त्याचे पुरावेच दिले आहेत. तसेच भाजपला गद्दार ठरवत जाहीर निषेधही केला आहे.

गलवान खोऱ्यातील चीनच्या घोसखोरीनंतर भारताने सूड घ्यावा अशी मागणी होऊ लागली. अखेर जनतेचा दबाव लक्षात घेऊन मोदी सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेअरइट, टिकटॉक व हॅलो अॅपसह चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर देशवासीयांनी हे अॅप वापरणे बंद केले. अनेक भारतीयांनी मोबाइलमधून तात्काळ हे अॅप डिलिट करुन टाकले. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. यावर बरीच चर्चा देखील झाली. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे चीनला मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता बंदी घातलेल्या ह्यापैकी एका अॅपचा वापर भाजप करत असल्याचे सचिन सावंत यांनी निदर्शनास आणलं आहे. ‘कॅमस्कॅनर’ हे ते अॅप आहे. ह्या अॅपचा वापर करुन भाजपनं आपल्या पक्षांतर्गत नियुक्त्यांचं एक पत्रक स्कॅन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते पत्रकही त्यांनी शेअर केलं आहे. चिनी अॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे स्पष्ट झाल्याची टीका सावंत यांनी केली आहे.