भाजपची बुधवारी 3 री मेगाभरती, ‘या’ दिग्गजांचा होणार प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना गळती लागली आहे. भाजपच्या दोन मेगाभरतीनंतर बुधवारी (दि.११) भाजपची तिसरी मेगाभरती होणार आहे. या वेळी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपत प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील दिग्ग्ज नेत्यांचा समावेश आहे.

भाजपची तिसरी मेगाभरती मुंबईच्या गरवारे क्लब येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्विराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपची तिसरा मेगाभरती होणार आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना निवडणुकीसाठी नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. भाजपची दुसरी मेगाभरती गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित सोलापूर येथे झाली होती. तर पहिली मेगाभरती मुंबई येथे झाली होती.