भाजपाच्या गुंडागर्दीचा लवकरच ‘पर्दाफाश’ करणार ! शिवतीर्थावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, सेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थवर शपथ विधी घेणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णयापर्यंत आले असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. भाजपाने सरकारी यंत्रणाचा वापर करत घाणेरडे राजकारण गेले काही दिवस सुरु ठेवले आहे. भाजपा करीत असलेल्या गुंडागर्दीचे पुरावे आपल्यापर्यंत आले असून लवकरच त्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी जाहीर करुन एक मोठा बॉम्ब टाकला आहे.

संजय राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद येऊन खळबळ उडवून दिली आहे. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला असून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतीर्थावर शपथविधी होईल, असे जाहीर करुन टाकले आहे.

नेहमीपेक्षा राऊत आज अधिक आक्रमक होते. राऊत म्हणाले, हरियाणातील पेच सोडविण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पुढाकार घेतला. महाराष्ट्रात सेनेबरोबर युती करताना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पुढाकार घेतला होता. मग आता का माघार घेत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी त्यावेळी काय ठरले ते राज्य नेतृत्वाला सांगावे व त्याची अंमलबजावणी करायला सांगितले तर प्रश्न सुटू शकतो. शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबतच तडजोड करायची शक्यता नाही.

भाजपा गेले काही दिवस सरकारी यंत्रणाचा वापर करुन घाणेरडे राजकारण करत असून लोकांना दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचे पुरावे आपल्याकडे आले असून त्यांचा लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले. शिवसेनेला १७० आमदारांचा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.