‘ही तर रावणाची औलाद’, काँग्रेसचे नेते अधीर चौधरींचं भाजपच्या ‘त्या’ नेत्यावर ‘टीकास्त्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हेगडे वादाच्या कचाट्यात सापडले आहे. हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचेच पडसाद आता लोकसभेत उमटले असून काँग्रेस नेते या वक्तव्याचा निषेध करत असून भाजप नेत्यांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, ज्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी हेगडे यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत भाजपवर टीकास्त्र डागले. ‘आज हे लोक महात्मा गांधींना शिव्या देतात, ही रावणाची औलाद आहे, ते रामाचे पुजारी असलेल्या गांधींचा अपमान करतात, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला. मात्र चौधरी यांच्या विधानावर भाजपा खासदारांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात गदारोळ माजला. गोंधळाच्या वेळी सभापती म्हणाले की, चौधरी यांचे वक्तव्य कामकाजात समाविष्ट केले जाणार नाही.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, लोकसभेत सीएए आणि एनआरसीबाबत आम्ही महात्मा गांधींच्या आदर्शांचे अनुसरण करून शांततेत निदर्शने करीत आहोत. गांधींच्या आदर्शांवर जगभर चर्चा केली जाते, परंतु आता त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. दरम्यान, गांधींवर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्याची मागणी काँग्रेस खासदारांनी लावून धरली होती.

दरम्यान, कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कुमार कटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेगडे यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अनंतकुमार हेगडे यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.