मतदार यादीचा बट्ट्याबोळ ! एकाच महिलेचे ६८ वेळा नाव

यादीत हजारो बोगस नावं असल्याचा शिवसेना, बविआचा आरोप

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशभरात ९ राज्‍यांतील ७१ जागांसाठी हे मतदान होत आहे. महाराष्ट्रात १७ जागांवर आज मतदान होत आहे. पालघर येथे देखील आज मतदान होत आहे. मात्र या मतदार संघात मतदार यादीत हजारो नावं बोगस असल्याचा आरोप शिवसेना आणि बविआ पक्षांनी निवडणूक आधिकऱ्यांकडे केला आहे.

पालघर मतदार संघात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. दरम्यान आज मतदानाच्या दिवशी पालघरमध्ये मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी बहुजन विकास आघाडीने ६० हजार मतदारांची नावे दोन वेळा येत असल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेने ५६ हजारांची दोनदा नावे येत असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्यांमध्ये विशेष बाब म्हणजे एका महिलेचे नाव तब्बल ६८ वेळा मतदार यादीत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीची चिरफाड करून बोगस मतदार असल्याचं सांगितलं आहे. या यादीत ५६ हजार मतदारांची दोन वेळा तर इतर हजारो मतदारांची तीन, चार, पाच वेळा नावे आली आहेत.

महाराष्ट्रात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, मावळ, शिरुर, शिर्डी या मतदार संघावर आज मतदान होत आहे. यात उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.