‘दबंग ३’ नंतर सलमान खानच्या ‘या’ चित्रपटाच्या सिक्वेलला निर्देशित करणार प्रभुदेवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘दबंग 3’ या चित्रपटानंतर बॉलिवूड स्टार सलमान खानचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतिक्षा करीत आहेत. 2019 च्या शेवटच्या आठवड्यात त्यांचा ‘दबंग 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करु शकला नाही, परंतु सलमानच्या चाहत्यांना पुन्हा एकदा दबंगची अ‍ॅक्शन आवडली आहे. ‘दबंग 3’ चे दिग्दर्शन प्रभुदेवांनी केले होते. सलमानबरोबर पुन्हा एकदा तो आपला चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सलमान खान आता प्रभुदेवाबरोबर त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार ‘टायगर 3’ च्या कथेवर सध्या काम सुरु आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहेत. ‘एक था टायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते, तर ‘टायगर जिंदा है’ दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते.

दिग्दर्शक कबीर खान आणि अली अब्बास जफर यांच्या कामामुळे सलमान खान खुश नाही. फ्लॉप झालेल्या ‘ट्यूबलाइट’ चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. त्याचबरोबर ‘भारत’ हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही आणि यामुळेच सलमान खानला यापुढे या दोघांसोबत काम करण्याची इच्छा नाही.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर सलमान लवकरच ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ‘कभी ईद कभी दिवाली’ 2021 मध्ये ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होईल. ज्याची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत आणि दिग्दर्शन फरहाद करणार आहेत.