Coronavirus : दुसर्‍यांदा देखील गायिका कनिका कपूरचा ‘कोरोना’ची टेस्ट रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’

पोलीसनामा ऑनलाइन – लंडनहून परतलेल्या गायिका कनिका कपूरचा दुसरा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कनिकाच्या पहिल्या चाचणीच्या रिपोर्टवर कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. म्हणून तिची दुसर्‍यांदा चाचणी करण्यात आली. सध्या कनिकाची प्रकृती स्थिर आहे. रविवारी कनिकाची दुसर्‍यांदा चाचणी करण्यात आली. यावेळी कनिकाच्या शरीरात करोना व्हायरसचा हाय डोस आढळला.

कनिकाची पहिल्यांदा कोरोना चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे वय आणि लिंग यांची माहिती चुकीची देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय 28 वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आले होते. त्यामुळे या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती. त्यामुळे कनिकाची दुसर्‍यांदा टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये ती कोरोना बाधित असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी कनिकाने रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली होती. मात्र आम्ही रुग्णांना सर्वोत्तम सेवा पुरवत असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. किंबहुना सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांनी डॉक्टरांना त्रास न देण्यापेक्षा सहकार्य करावे असेही रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे कनिकाच्या संपर्कात आलेल्या 266 जणांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यापैकी 60 हून अधिक नमुने तपासले गेले. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. या 266 लोकांपैकी जर कोणात करोना विषाणूची लक्षणे दिसली तर आणखी नमुने तपासले जातील. असेही त्यांन स्पष्ट केले आहे.