व्यावसायिकाकडे दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मालेगाव शहरातील एका कापड व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली होती. व्यावसायिकाने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी बुधवारी (दि.२८) रात्री एकच्या सुमारास अटक करण्यात आली.

शहरातील रौनकाबाद येथे राहणारे कापड व्यावसायिक शहेजाद शेख महेमुद (३८) हे बुधवारी दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास फतेह मैदान येथून जात होते. त्यावेळी आरोपी मोहंमद जाफर रईस अहमद (३०) व त्याच्या इतर तीन साथीदारांनी कापड व्यावसायिक शहेजाद शेख यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहेजाद शेख यांनी आझादनगर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी चौघाही संशयित आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींना बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आसीफ शेख करीत आहेत.

ग्रामपंचायतमधील अभिलेखे जाळले
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मुळी ग्रामपंचायत कार्यालयातील अभिलेखे जाळल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेने वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. मुळी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार काही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती़ या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतमधील संपूर्ण अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आदेश दिले होते.

२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विस्तार अधिकारी भालेराव यांनी तशी सूचना ग्रामसेवक नवटंके यांना देऊन बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले. मात्र बुधवारी सकाळीच ही घटना समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. ग्रामपंचायतमधील सेवक सकाळी कार्यालयात आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. आत जावून पाहणी केली असता कपाटाची दारे उघडे होती.

आतील दस्ताऐवज गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजुबाजूला पाहणी केली. तेव्हा कार्यालयाच्या बाहेरील पिंपळाच्या झाडाखाली दस्ताऐवज जळालेल्या अवस्थेत त्यांना दिसले. ही माहिती ग्रामसेवक नवटंके यांना दिली. नवटंके यांनी कार्यालयात येऊन पाहणी केली असता कार्यालयातील संगणक संचही गायब झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.