वृद्धाची जीभ छाटून केला खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लोणीकंद (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलवडी येथे एका वृद्ध इसमाची जीभ छाटून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी दोनतासात सापळा रचून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने क्षुल्लक कारणावरुन खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

तुकाराम निवृत्ती साळुंके (वय ७०, कोलवडी ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेशकुमार शिवशरण पासवान (वय २२ वर्षे, रा. उंद्रे वस्ती, मूळगाव- पखरौली फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून सुरेशकुमार पासवान याने दारू पिऊन येऊन लाथाबुक्क्यांनी, पोटात, तोंडावर, छातीवर मारहाण करून, त्यांची जीभ छाटून पळून गेला होता.

या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासचक्रे फिरवली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना सापळा रचून आरोपीला गजाआड केले. आरोपी सुरेशकुमार पासवान यास गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ दोन तासांमध्ये पकडण्यात आले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेली उप विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, संतोष कुलथे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, सूरज वळेकर, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव सस्ते हे करीत आहेत.