निर्भया केस : दोषी पवनची याचिका फेटाळली, उद्याच फासावर लटकवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील दोषी पवन गुप्ताने बलात्काराच्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचे सांगत याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने पवन गुप्ताची याचिका फेटाळून लागवल्याने त्याला शुक्रवारी (दि.20) पहाटे फासावर लटकवण्यात येणार आहे. दोषींनी फाशीच्या शिक्षेपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले. दोषींना उद्या फाशी देण्यात येणार आहे. दोषींनी त्यांच्या कुटुंबीयांची बंद खोलीमध्ये शेवटची भेट घेतली आहे.

निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी जल्लाद पवन तिहार तुरुंगात दाखल झाला आहे. दोषींच्या डमीला फाशी देण्याची ट्रायल त्याने केली. त्यामुळे उद्या 20 मार्चला पहाटे साडेपाचला दोषींना फाशी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पवन गुप्ताची याचिका फेटाळून लावल्यावर निर्भयाची आई आशा देवी यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने त्यांना बऱ्याचदा संधी दिल्याने फाशी टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे देण्याची त्यांना सवय झाली होती. आता न्यायालयाला त्यांची खेळी समजली आहे. निर्भयाला उद्या नक्की न्याय मिळणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

याचिकेत कोरोनाचा उल्लेख
दरम्यान, चारही दोषींनी दिल्लीतील पटियाला न्यायालयामध्ये अर्ज दाखल करत फाशी रोखण्याची मागणी केली होती. यामध्ये वेगवेगळ्या विचाराधीन असलेल्या याचिकांचा उल्लेख केला. एवढेच नाही तर कोरोनालाही मध्ये घेतले. कोरोना देशभरात पसरत असून हा काळ फाशी देण्यासाठी योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

शवविच्छेदन डीडीयू हॉस्पीटलमध्ये
निर्भया प्रकरणातील आरोपींना उद्या पहाटे फाशी देण्यात येणार आहे. तिहारच्या अधिकाऱ्यांनी सांगितेले की, चारही दोषींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन डीडीयू हॉस्पीटलमध्ये करण्यात येणार आहे. जर कोणती समस्या आढळल्यास त्यांचे अन्य हॉस्पीटलमध्ये शवविच्छेदन होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचे पॅनल असून कदाचित शवविच्छेदनाचे व्हीडिओ शुटिंगही केले जाणार आहे.