लॉकडाऊनमध्ये Parle-G नंतर आता ब्रिटानियानेही केलीभरघोस ‘कमाई’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना संकट आणि लॉकडाऊन दरम्यान विक्रमी मागणीमुळे काही कंपन्यांनी भरघोस नफा कमावला आहे . गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ब्रिटानिया इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दुप्पट नफा मिळविला आहे. दरम्यान, 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर देशात सर्व हालचालींना ब्रेक लागला होता. बस आणि गाड्या बंद करण्यात आल्या. पण यावेळी मोठ्या संख्येने लोक पायीच घराकडे निघाले. बिस्किटांची पाकिटे शेकडो किलोमीटरच्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरली. काहींनी ते स्वतः विकत घेतले तर काहींनी इतरांना मदत म्हणून दिले.

बिस्किटसह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या ब्रिटानिया इंडस्ट्रीजला 30 जून 2020 रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 542.68 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. हे आधीच्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. सुमारे 118 टक्क्यांची उडी नोंदविली गेली आहे. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन दरम्यान बिस्किटांसह दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली. मोठ्या प्रमाणात, लोकांनी ब्रिटानियाच्या बिस्किटसह इतर उत्पादने घरीच साठवली होती, जेणेकरून पुढे कमतरता भासू नये. अलीकडेच, पार्ले-जी कंपनीनेही उत्पन्नाची उत्कृष्ट आकडेवारी सादर केली.

वित्तीय वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ब्रिटानियाचा नफा 248.64 कोटी होता. निव्वळ नफ्यात वाढ होण्याचे कारण जास्त उत्पन्न असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने सांगितले होते की, विक्रीतही घसरण झाली आहे आणि आता ती अर्ध्यावर आली होती. पण आता कोरोनाच्या संकटातही डाव पलटला. ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) वरुण बेरी यांचे म्हणणे आहे की, कोविड – 19 च्या साथीच्या आजारामुळे या तिमाहीत अर्थव्यवस्थेला अडथळा निर्माण झाला आणि साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन देखील अडथळे निर्माण करु लागला. कारखाने, आगार, वाहतूक, विक्रेत्यांचा संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम झाला. त्यांनतर जसे लॉकडाउनवरील निर्बंध कमी करण्यात आले कंपनीने पहिल्या स्तरावर वितरण परत आणण्यावर आणि ग्रामीण व अंतर्गत भागात प्रवेश वाढवण्यावर भर दिला. ते म्हणाले की, कोरोना प्रकरणे सतत वाढत आहेत, अनिश्चिततेमुळे कंपनीने त्वरित खर्च कमी करण्यावर भर दिला. यासाठी, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढविली गेली, कच्च्या मालाची नासधूस कमी केली आणि खर्च सुरळीत केला.

बेरी म्हणाले की, सध्याची परिस्थिती आणि वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने मीडिया व जाहिरातींवर खर्चाचेही व्यवस्थित नियोजन केले. कंपनी ग्राहकांच्या पसंतीवर, वितरण मॉडेलवर आणि अल्पकालीन बदलांवर कोरोनामुळे होणाऱ्या परिणामावरही सतत अभ्यास करत आहे. दरम्यान, मागील महिन्यात पार्ले-जी यांनी उत्कृष्ट व्यवसायाची आकृती सादर केली. विक्रीच्या बाबतीत 82 वर्षांचा विक्रम मोडल्याचे कंपनीने म्हटले होते. कंपनीच्या एकूण बाजाराचा वाटा सुमारे 5 टक्क्यांनी वाढविण्यात आला आणि त्यापैकी 80-90 टक्के वाढ पार्ले-जी च्या विक्रीमुळे झाली.