जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात बुलढाणाचा जवान शहीद

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) हे जवान शहीद झाले आहेत. सोपोर भागात १८ एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना घडली़

चंद्रकांत भाकरे हे गेल्या १५ वर्षांपासून सीआरपीएफच्या १७९ व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मागे आईवडिल, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. चंद्रकांत हे शहीद झाल्याची वार्ता गावात कळताच या शेतकरी कुटुंबीय व मित्र परिवार एकत्र झाला. त्यांनी चंद्रकांत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

सोपोर भागात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व पोलिसांची तुकडी गस्त घालत असताना अतिरेक्यांशी चकमक झाली होती.सीआरपीएफचे जवान एका तपास नाक्यावर गस्त घालत होते़ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८), राजीव शर्मा (वय ४२, रा़ वैशाली, बिहार), परमार सत्यपाल सिंग (वय २८, रा़ साबरकंठा, गुजरात) हे तिघे शहीद झाले. अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.काश्मीर खोर्‍यात एका आठवड्यात अतिरेक्यांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे.