Nasik : 20 लाख रूपयांची बॅग घेऊन सराफी व्यावसायिक दुचाकीवरून जात असताना चोरटयांनी केलं ‘काम’ तमाम

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –   सोने-चांदी खरेदीसाठी दुचाकीवरून आलेल्या सराफाकडील 20 लाख रुपयांची रोकड असलेली बँग चोरट्यांनी हिसकावून (businessman-robbed-rs-20-lakh) पोबारा केला. नाशिक येथील सराफ बाजारातील मारुती मंदिर परिसरात गुरुवारी (दि. 29) सायंकाळी ही घटना घडली. यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 20 लाखांची रोकड लंपास झाल्याने गुन्हेगारांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

भरत मधूकर पवार (रा. मेरी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचे औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात सराफी पेढी आहे. दुकानासाठी लागणारे सोने व चांदी खरेदीसाठी ते नेहमीच दुचाकीवरून सराफ बाजारात येतात. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते खरेदीसाठी सराफ बाजारात आले होते. त्यावेळी पवार नेहमीप्रमाणे पैशांची पिशवी दुचाकीच्या पाठीमागील कॅरियरला बांधली होती. मारुती मंदिर परिसरात ते दुचाकीवरून प्रवास करताना गर्दीतील पादचारी चोरट्यांनी रोकडवर डल्ला मारला. पवार यांना काही कळण्यापूर्वीच बांधलेली पिशवी चोरट्यांनी सोडून पळ काढला. ही बाब लक्षात येताच पवार यांनी सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या फौजफाट्याने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग काढला. मात्र, रात्री उशिरापर्यंत चोरटे हाती लागले नव्हते.

तिघांचा समावेश

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी मोहीम हाती घेतली. मात्र, रात्री उशिरापर्यंत हा तपास सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार यात किमान तीघे असण्याची शक्यता आहे. सराफी व्यावसायिक पवार नेहमी याच पद्धतीने पैसे घेवून बाजारात येतात. त्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून अथवा पाठलाग करून हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.