CAA आंदोलन : युपीत हिंसक वळण, NH – 8 वर वाहतूक कोंडी तर दिल्लीत 21 विमाने रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज डावे पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले असून दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जमावाने एका बसला आग लावली. तसेच तुफान दगडफेक केली आहे. तर दिल्लीत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. उत्तरपूर्व दिल्लीमध्ये पोलिसांनी ३७ जणांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनामुळे प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे. तसेच विमानसेवाही प्रभावित झाली असून २१ विमाने रद्द करण्यात आली आहेत.

सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनांमुळे महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून यामध्ये विमान कंपन्यांचे कर्मचारी अडकल्याने विमानसेवा रद्द कराव्या लागत आहेत. इंडिगोने १९ विमाने रद्द केली तर स्पाइस जेटने दिल्लीवरुन एक आणि एअर इंडियाने एक विमान रद्द केले आहे.

दिल्लीत इंटरनेट, मोबाइल सेवा बंद –
केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर दिल्लीमध्ये भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओने काही परिसरात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे. दिल्लीत १७ हून अधिक मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. तर मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानातही आंदोलन करण्यात येत असून सेलिब्रिटी, नेते एकत्र आले आहेत. येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात बस जाळली –
उत्तर प्रदेशातील संभल येथे जमावाने जाळपोळ आणि दगडफेक केली. एका बसला आग लावली. पाटण्यात कन्हैय्या कुमार आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/