कॅलिफोर्नियात 72 तासात 11 हजार विजा कोसळल्या, NASA नं पोस्ट केला व्हिडीओ

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील जंगलाला लागलेल्या आगीने महाभयंकर रुप धारण केलं आहे. जंगलाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरचीही मदत घेतली आहे. मात्र, आगीच्या उठलेल्या ज्वाळांमुळे हेलिकॉप्टर कोआलिंगाजवळ कोसळले. या आगीच्या घटनेमुळे राज्यपाल गॅविन न्यूसम यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

30 हजार इमारती जळून खाक

उत्तर कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीत गेल्या चार दिवसात रौद्र रुप धारण केलं आहे. आगीत जवळपास 30 हजार इमारती जळून खाक झाल्या असून, नैसर्गिक साधन संपत्तीचे अतोनात नुकसान झाले आहे. या आगीची तीव्रताच इतकी आहे की, नासाच्या उपग्रहांमधूनही वणवा पेटल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमेकिरेतील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 72 तासांत कॅलिफोर्नियात 11 हजार विजा कोसळल्या आहेत. त्यानंतर वणवा पेटल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सगळीकडे धुराचे लोट

या आगीमध्ये सध्या वेगवेगळ्या 26 आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील 23 ठिकाणी आगीची तीव्रता जास्त आहे. या आगीचा एकूण 2 लाख 26 हजार 100 एकर परिसराला फटका बसला आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धुराचे लोट कित्येक किलोमीटरवरून स्पष्ट दिसत आहेत. या धुरामुळं कॅलिफोर्निया आणि आजूबाजूच्या प्रांतातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.

नासाने पोस्ट केला व्हिडीओ

कॅलिफोर्नियाच्या आगीची तीव्रता एवढी गंभीर आहे की, नासाच्या उपग्रहावरून या आगीचे धूर स्पष्ट दिसत आहेत. नासाने या धुराचा एक लहान व्हिडीओ शेअर केला आहे. या आगीमुळे लेक आणि नापा प्रांतातील नागरिकांनाही फटका बसण्याची शक्यता असल्याने त्यांना तातडीने परिसर सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आज मोंटाना, ल्डाहो, उटाह आणि कोलोरॅडो परिसरात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.