नगरचे पालकमंत्री प्रा. शिंदेंच्या मतदार संघात गांजाची शेती ; एकाला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात गांजाची शेती केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील शेतात गांजाची झाडे आढळून आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुरेश दत्तात्रय जाधव यास अटक केली आहे.
कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे एका शेतात गांजाच्या झाडांची शेती केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस उपअधीक्षक सातव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास निमगाव डाकू येथील सुरेश जाधव यांच्या शेतात छापा टाकला. शेतातील पिकांमध्ये गांजाच्या 8 झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी शेती मालक जाधव यास अटक केली आहे.
याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात देविदास पळसे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय जाधव याच्याविरुद्ध अमली पदार्थ बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.