‘लोहगाव विमानतळावर कार्गो सेवेला जास्तीत जास्त प्राधान्य देणार’ : गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोहगाव विमानतळावर कार्गोचे विस्तारीकरण करून जास्तीत जास्त मालवाहतूक पुण्यातून विमानानं सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हवाई दलाकडून अडीच एकराचा भूखंड मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या पुढील काळात कार्गोच्या सेवेच्या विस्ताराला प्राधान्य असेल अन् त्यासाठी दिल्लीतही पाठपुरावा करणार आहे असं स्पष्टीकरण खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी दिलं आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाचे कामही 47 टक्के पूर्ण झालं असून 2 वर्षात ते पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं.

विमानतळ सल्लागार समितीची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर झालेल्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग उपस्थित होते. विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी, विमानतळ व कार्गो सेवेचे विस्तारीकरण, भूसंपादन, पार्किंग लॉटचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा झाली.

बापट म्हणाले, “विमानतळ विस्तारीकरणाचे काम वेळत म्हणजे जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण होईल. पार्किंग लॉटचे बांधकामही 2022 पूर्वीच पूर्ण होणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यासाठी खासगी भूखंड संपादित करण्याची प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्यात येईल. कार्गोची क्षमता वाढावी अशी उद्योगांची मागणी आहे. त्यासाठीचा भूखंड ताब्यात आल्यावर 150 टनांची कार्गोची वाहतूक 500 टनांपेक्षा जास्त होऊ शकते. सातारा, नगर, सांगली, कोल्हापूरवरूनही पुण्यात माल येऊन कार्गोद्वारे तो जगभर जाऊ शकतो. त्यामुळं कार्गोवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी पुरेशा सुविधा देण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू आहे. हवाई दलाकडून साडे आठ एकर आणि अडीच एकराचा भूखंड विमानतळ प्रशासनाच्या ताब्यात मिळावा यासाठी मुख्यालयाशी संपर्क साधला आहे. दिल्लीत त्यासाठी बैठक घेणार असल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं.

खासदार चव्हाण यांनी गर्दीच्या वेळात विमानतळ परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका, पोलिसांनी तातडीनं आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.

असे होणार बदल
विमानतळावरील प्रीपेड रिक्षा थांब्याची मुदत 7 मार्च पर्यंत वाढवली आहे. विमानतळ प्राधिकरणानं परवानगी दिल्यास रिक्षाथांबा विमानतळाच्या आवारात ठेवणार आहे. शिवाजीनगर ते विमानतळ दरम्यान सिग्नल फ्री कॉरिडॉर करण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांना आराखडा तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. विमानतळाच्या आवारातून 5 मार्गांवर पीएमपीची बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिका, राज्य सरकार यांच्याकडील विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक होणार आहे.