सामाजिक न्यायमंत्र्यावरच फसवणूकीचा गुन्हा दाखल

दिलीप कांबळेंसह चौघांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन – वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याच्या आमीषाने तब्बल १ कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालिन राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सध्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद कोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी दिलीप काळभोर याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी फेटाळून लावला आहे. याप्रकरणी विलास चव्हाण यांनी तक्रार दिली होती.

काळभोर आणि विलास चव्हाण यांची एका कार्य़क्रमात ओळख झाली होती. त्यावेळी काळभोर याने दिलीप कांबळे यांच्यासह मंत्रालयातील विविध अधिकाऱ्यांशी ओळख असून वाईन शॉपचा परवाना काढून देतो असे आमिष विलास चव्हाण यांना दाखवले. तसेच मुंबईतील स्पेन्सर रिटेलचा परवाना ट्रान्स्फर करुन देतो मात्र, त्यासाठी दोन कोटी १५ लाख रुपये द्यावे लागतील असे आरोपी काळभोर याच्यासह आरोपी दयानंद वनंजे याने सांगितले. दोन्ही आरोपींनी चव्हाण यांची खात्री पटवून देण्यासाठी राज्यमंत्री कांबळे यांच्या दालनात घेऊन गेले. त्यावेळी अटी-शर्ती पूर्ण केल्यास परवाना मिळवून देऊ, असे आश्वासन खुद्द कांबळे यांनी विलास चव्हाण यांना दिले होते.

त्यानंतर वेगवेगळ्या वेळी एकूण ५२ लाख ५० हजार रुपये ‘आरटीजीएस’द्वारे वरील तिन्ही आरोपींसह आरोपी सुनिल जबरचंद मोदी याच्या खात्यावर जमा केले. त्याशिवाय लाखोंची रोख रक्कमदेखील वेळोवेळी दिली. अशा प्रकारे एकूण एक कोटी ९२ लाख रुपये चारही आरोपींना देण्यात आली असल्याचे तक्रारदार विलास चव्हाण यांनी सांगितले.

पैसे देऊनदेखील परवाना मिळत नसल्याने तगादा लावल्यानंतर आरोपींनी टाळाटा‌ळ केली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयात ५ नोव्हेंबर २०१८ रोजी तक्रार नोंदवण्यात आली. आरोपींविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला नसल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने आदेशाने १३ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी दिलीप काळभोर याने अटकपूर्व जामीन अर्ज केला. त्यानंतर या प्रकरणात आणखी काही जणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता सरकारी वकिलांनी कोर्टात व्यक्त केली. त्यानंतर कोर्टाने आरोपी दिलीप काळभोर याचा कोर्टाने आरोपीचा जामीन फेटा‌‌ळला.