Coronavirus : ‘कोरोना’त लग्नाची हौस फिटली ! वधू-वर, आई-वडिलांसह भटजीही पोलिसांच्या ताब्यात

पोलिसमाना ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन असतानाही पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करुन लग्नाची हौस करणे अंगलट आले आहे. त्यामुळे वधू-वर, त्यांचे आईवडिल आणि भटजीही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. माजलगाव शहरापासून 1 किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे लग्नासाठी पाहुणे जमले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली होती.

शहर पोलिस लग्नस्थळी गेले असता, यावेळी पोलिसांना लग्नस्थळी 100 ते 125 लोक जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशाची आठवण करून दिली. तसेच जमलेल्यांना पाहुण्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला. त्यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

यानंतर 5-6 नातेवाईकांनी लग्न उरकुन घेतल्याची माहिती आहे. या घटनेने येत्या काही दिवसात लग्न असणार्‍या कुटुंबीयांमध्ये खळबळ माजली आहे. विठ्ठल पांडुरंग कांबळे (रा . ब्रम्हगाव ता . माजलगाव ( नवरीचे वडील ), मनकर्णा सुभाष पाटोळे (रा लवुळ ता. माजलगाव ( नवरदेवाची आई ), ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे (रा . लवुळ (नवरदेवाचे चुलते ), चंदू महादेव आटवे (रा . लवुळ) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.