परीक्षा न घेता 10 वी – 12 वीचा रिझल्ट घोषित करू शकते CBSE, असे होईल मूल्यांकन

नवी दिल्ली : 10वी आणि 12वीची परीक्षा रद्द केल्यानंतर सीबीएसईकडून रिझल्टच्या घोषणेची नवी योजना बनवली जात आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, सीबीएसई आता परीक्षा घेण्याच्या मूडमध्ये नाही. विद्यार्थ्यांचे रिझल्ट घोषित करण्यासाठी सीबीएसईकडून नवी स्कीम तयार करण्यात येईल आणि त्याआधारे मूल्यांकन करून रिझल्ट जारी करण्यात येईल. सांगितले जात आहे की, सीबीएसई 15 जुलैपर्यंत रिझल्ट घोषित करू शकते.

सीबीएसईच्या सूत्रांनी सांगितले की, 10वी आणि 12वीचे विद्यार्थी ज्यांनी परीक्षा पूर्ण केली आहे, त्यांचे सामान्य पद्धतीने मूल्यांकन केले जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी 3 पेक्षा जास्त पेपर दिले आहेत, उर्वरित पेपरसाठी सर्वातजास्त 3 विषयांच्या सरासरीने गुण जोडले जातील. ज्यांनी 3 पेपर दिले आहेत, उर्वरित परीक्षांसाठी सर्वश्रेष्ठ 2 विषयांच्या सरासरी गुणांना जोडण्यात येईल.

सीबीएसईच्या 10वी, 12वीच्या 1 ते 15 जुलैपर्यंत होणार्‍या परीक्षा रद्द

अशाप्रकारे ज्या विद्यार्थ्यांनी 1 किंवा 2 पेपर दिले आहेत, त्यांचे रिझल्ट बोर्ड परफॉर्मन्स आणि इंटरनल प्रोजेक्ट असेसमेंटवर होतील. सीबीएसईकडून 15 जुलैपर्यंत रिझल्ट घोषित केले जातील. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक बोर्ड परीक्षेला बसण्याची व्यवस्था केली जाईल, जेणेकरून ते आपला परफॉर्मन्स सुधारू शकतात.

सीबीएसईचे म्हणणे आहे की, स्थिती अनुकूल झाल्यानंतर वैकल्पिक बोर्ड परीक्षा आयोजित केली जाईल. यासोबतच सरकार दिल्ली युनिव्हर्सिटीला अर्जाची कालमर्यादा (4 जुलै) वाढवण्यास सांगू शकते, कारण सीबीएसईकडून विद्यार्थ्यांचा रिझल्ट उशीराने घोषित केला जाईल.

कोरोना संकटामुळे सीबीएसईने 1 ते 15 जुलैपर्यंत होणार्‍या परीक्षा स्थगित केल्या आहेत. ही माहिती बोर्डाने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान दिली. यानंतर कोर्टाने केंद्र आणि सीबीएसईला 12वीच्या परीक्षेबाबत नवीन नोटिफिकेशन जारी करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी आज सुद्धा सुनावणी होईल.

सीबीएसई आणि केंद्राला सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की, नव्या नोटिफिकेशनमध्ये आंतरिक मूल्यांकन आणि परीक्षांमध्ये पर्याय स्पष्ट करा. सोबतच स्टेट बोर्ड परीक्षेची सध्याची स्थिती, परीक्षांची तारीख, याबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. कोर्टाने आज सकाळपर्यंत सीबीएसईकडून नवीन नोटिफिकेशन आणि प्रतिज्ञापत्र मागितले आहे.