शिक्षा सुनावल्यानंतर दोषींना 7 दिवसात फासावर लटकवा : केंद्र सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा लांबली आहे. दोषी या ना त्या कारणाने फाशीच्या शिक्षेला उशीर व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे निर्भयाच्या आई आशा देवी यांनी सांगत संताप व्यक्त केला. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की अशा गुन्हेगारांना शिक्षेनंतर 7 दिवसांच्या आत फासावर द्यावे. निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे ही मागणी केली.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे ही मागणी करण्यात आली आहे. पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यानंतर क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी कालमर्यादा ठरवल्या गेल्या पाहिजेत. न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केल्यानंतर 7 दिवसांच्या आत याचिका दाखल करण्याचं आरोपींना बंधन घातलं गेलं पाहिजे असे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले.

गुन्हेगारांची दया याचिका फेटाळल्यानंतर सात दिवसांच्या आत डेथ वॉरंट जारी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारे, तुरुंग प्रशासनांना देण्यात यावेत. तसेच डेथ वारंट जारी केल्यानंतर दोषींना सात दिवसांच्या आत फाशी देण्यात यावी. दोषींच्या सहकारी आरोपींची पुनर्विलोकन याचिका, क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका कोणत्याही टप्प्यावर असली तरी ज्यांच्या विरोधात डेथ वॉरंट जारी करण्यात आलं की त्याला सात दिवसात फाशी देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्याची विनंतीही गृहमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 20 जानेवारी रोजी निर्भया प्रकरणातील दोषींची याचिका फेटाळली, गुन्हा घडला तेव्हा आपण अल्पवयीन होतो असा दावा आरोपी पवन गुप्ताने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. त्यावर नवीन याचिका दाखल करुन प्रकरण प्रलंबित ठेवता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. दिल्लीतच्या एका न्यायालायने निर्भयाचे मारेकरी असलेल्या विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांच्या विरोधात डेथ वारंट जारी केले आहे. या चारही आरोपांनी 22 जानेवारीला फाशी होणार होती. परंतु फाशी पुढे ढकलण्यात आल्यानंतर 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता ही फाशी देण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –