केंद्राच्या ‘त्या’ धोरणाचा पुणे महापालिकेला मोठा फटका ! 500 हून अधिक वाहनं भंगारात निघणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 8 वर्षांपूर्वीच्या गाड्यांना ग्रीन टॅक्स लागू करण्यासोबत, 15 वर्षांवरील सरकारी खासगी गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हा निर्णय पाहता पुणे महापालिकेच्या वाहन विभागातील लहान मोठ्या मिळून सुमारे 500 हून अधिक गाड्या भंगारात निघणार आहेत.

1 एप्रिल 2022 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाकडं महापालिका प्रशासनानं अद्यापही गांभीर्यानं पाहिलं नसून शासनाचे याबाबतचे आदेश आल्यानंतर नेहमीप्रमाणे महापालिका धावपळ करून पुन्हा खासगी ठेकेदारांचे खिसे भरणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

महापालिकेच्या वाहन ताफ्यात 15 वर्षांपूर्वीची सर्वाधिक वाहनं ही शहरातील कचरा गोळा करण्याच्या कामासाठी वापरली जात आहेत. त्यात 15 वर्षांपासून 30 वर्षे जुनी असलेली सुमारे 250 वाहनं असून यात लहान मोठे कचरा गोळा करणारे ट्रक, ढंपर, यांचा समावेश आहे.

सोबतच उद्यान विभाग, श्वान विभाग व अतिक्रमण विभागासह महापालिकेच्या विविध विभागांकडे असलेल्या 20 ते 30 वर्षांपूर्वीच्या 150 तर 15 ते 20 वर्षांपूर्वीच्या 120 गाड्या आहेत. हे पाहता महापालिकेच्या ताफ्यातील 80 टक्क्यांहून अधिक लहान मोठ्या गाड्या केंद्र सरकारच्या पात्रतेच्या नियमावलीत बसणाऱ्या नसल्याचं सद्य स्थितीला दिसत आहे.

सरकारच्या निर्णयानुसार, एप्रिल 2022 पासून 15 वर्षे जुन्या वाहनांवर सरसकट स्क्रॅप पॉलिसी अवलंबली जाणार आहे. त्यामुळं महापालिकेनं आतापासूनच याबाबत पावलं उचलली नाहीत तर ऐनवेळी आउट सोर्सिंग च्या नावाखाली पुन्हा खासगी ठेकेदारीचे मोठे फावले जाणार आहे. यामुळं महापालिकेनं वेळीच वाहन विभागाचा आढावा घेऊन केंद्र सरकारच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याची गरज आहे.

घनकचरा विभागाकडील गाड्यांचा तपशिल –
1) 25 ते 30 वर्षांपर्वीच्या 18 गाड्या
2) 20 ते 25 वर्षांपूर्वीच्या 58 गाड्या
3) 15 ते 20 वर्षांपूर्वींच्या 51 गाड्या
4) 10 ते 15 वर्षांपूर्वीच्या 120 गाड्या
5) 5 ते 10 वर्षांपूर्वीच्या 225 गाड्या
6) 1 ते 5 वर्षांपूर्वीच्या 246 गाड्या

घनकचरा विभाग वगळता इतर विभागाकडील गाड्या –
1) 25 ते 30 वर्षांपर्वीच्या 26 गाड्या
2) 20 ते 25 वर्षांपूर्वीच्या 124 गाड्या
3) 15 ते 20 वर्षांपूर्वींच्या 120 गाड्या
4) 10 ते 15 वर्षांपूर्वीच्या 206 गाड्या

पुणे महापालिकेच्या वाहन विभागातील नोंदीनुसार एकूण 1963 लहान मोठ्या वाहनांपैकी केवळ 624 वाहनं ही 1 ते 5 वर्षांमधील आहेत म्हणजेच ती वापरण्यास योग्य आहेत. महापालिकेची कार्यपद्धती पाहता निविदा प्रक्रिया, पुरवठा यात महिनोंमहिने जाणार आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शहरातील कचरा उचलण्याच्या कामावर होणार आहे. त्यातच 35 ते 40 लखांपर्यंत जाणारी मोठी वाहनं कचरा विभागात अवघ्या 6-7 वर्षात खराब होत असल्यानं याकडंही गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे.

केंद्र सरकारचा निर्णय पाहता पुणे महापालिकेकडील सर्व वाहनांचा तपशिल मागवण्यात आला आहे. यात ज्या विभागाकडील खास करून घन कचरा व्यवस्थापन विभागाकडील 15 वर्षे जुन्या गाड्यांची संख्या लक्षात घेऊन, प्रशासनाला पुढील कार्यवाही तातडीनं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहनांविना महापालिकेच्या कुठल्याही कामाचा खोळंबा होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे.