नातेवाईकांसोबत सोनसाखळ्या हिसकाणारा सराईत जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्याहून पुण्यात येऊन नातेवाईकांसोबत परिसराची रेकी करत महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या एका सराईताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पोलिसांनी ७ सोनसाखळी चोऱ्या उघड करत ५ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १६० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक केलेल्या सराईताने त्याच्या ७  नातेवाईकांसोबत मिळून सोनसाखळी चोऱ्या केल्या आहेत. अशी माहिती परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी दिली.

गुलाम अली सरताजअली जाफरी (वय ३० वर्षे, वाल्मिकी शाळेजवळ, इंदिरा नगर, आंबिवली, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी मुंबई, ठाणे, नाशिक अहमदनगर येथे एकूण २१ गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या काही दिवसांत महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडत असल्याने परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी ३ वेगवेगळी पथके स्थापन केली होती. त्यानुसार पथकांनी राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी तपासासाठी गेलेल्या पथकांवर वेळोवेळी काही ठिकाणी हल्लेही झाले होते. त्यानंतर घटना घडलेल्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यानंतर विश्लेषण केले. तेव्हा शहरात सोनसाखळी चोरी करणारे हे ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांना मिळाली. त्यावरून पथकाने जाफरी याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने पुण्यात येऊन नातेवाईकांसोबत सोनसाखळी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून सिंहगड रोड ३,  कोथरुड २, अलंकार आणि वारजे प्रत्येकी एक असे ७ गुन्हे उघडकिस आणले. त्यानतंर त्याच्याकडून ५ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १६० ग्रॅम सोने जप्त केले. तसेच त्याचा आणखी एक साथीदारही निष्पन्न झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

अशी करत होते सोनसाखळी चोरी

जाफरी हा मुळचा ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील राहणारा आहे. तो आणि त्याचे नातेवाईक पुण्यात येऊन ज्या ठिकाणी सोनसाखळी चोरी करायची आहे. तेथे रेकी करत होते. त्यानंतर तेथ पल्सर दुचाकीवरून येऊन महिलांचे मंगळसुत्र हिसकावत होते. ते एकाच परिसरात थोड्या थोड्या अंतरावर सोनसाखळी हिसकावून नंतर महामार्गाने ठाण्याकडे परत जात होते. त्यांनी विशेषत: महामार्गजवळ असलेल्या परिसरातच सोनसाखळी चोरी केल्या आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संदिप बुवा, पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, जीवन मोहिते, कर्मचारी यशवंत ओंबसे, सचिन माळवे, निलेश जमदाडे, बाबूलाल तांदळे, दयानंद तेलंगे पाटील, अविनाश कोंडे, किशोर शिंदे, मयुर शिंदे, योगेश झेंडे, राजेंद्र लांडगे, संदिप घनवटे, वामन जाधव, मोहन भुरुक, राजेश सुर्वे, निलेश कुलथे, पुरुषोत्तम गुन्ला, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.