सरकारचा ‘चांदा ते बांदा’ योजनेला ‘चाप’, शिवसेनेचे ‘हे’ नेते ‘आंदोलना’च्या पवित्र्यात

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप शिवसेनेच्या सरकारच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तयार केलेल्या चांदा ते बांदा योजनेला ठाकरे सरकारने चाप लावला आहे. या योजनेतील कामे यापुढे मंजूर करू नयेत असे आदेश नियोजन विभागाने दिले आहेत. त्यामुळे आधीच मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज असलेल्या केसरकरांनी आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, केसरकरांचे राजकीय कट्टर विरोधक नारायण राणे यांनी सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका घेतल्यामुळे दीपक केसरकरांना शिवसेनेत एकटं पाडलं जातंय का अशी चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे ही योजना ?
राज्यातील ग्रामीण भागात उपलब्ध साधन संपत्तीवर आधारीत छोटे व्यवसाय आणि उद्योगधंद्यांना आर्थिक सहाय्य करून यातून रोजगार निर्मिती करण्यात येत होत. यातून ग्रामीण अर्थकरणाला बळकटी यावी यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर आणि त्यावेळी वित्त राज्यमंत्री असलेले सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. याची मुदत 2020 पर्यंत होती. मात्र आता या योजनेच्या कामांना कात्री लावण्यात आली आहे. स्वत:च्याच सरकारनं ही योजना थांबवल्यामुळे केसरकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आपल्याच सरकारमध्ये केसरकर बॅकफूटवर
नव्या सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदात कोकणातून फक्त उदय सामंत यांची वर्णी लागली. तर दीपक केसरकर यांना डावलण्यात आले. एवढेच नाही तर पालकमंत्रीपद देखील उदय सामंत यांना देण्यात आले. त्यामुळे केसरकर नाराज असल्याची चर्चा आहे. तर केसरकर यांना विचारात न घेता चांदा ते बांदा योजनेच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे केसरकर आपल्याच सरकारमध्ये बॅकफूटवर गेलेत.

फेसबुक पेज लाईक करा –