निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक वापरणार ‘कर्नाटक पॅटर्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला अजून ५ दिवस बाकी असतानाच विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले दिसून येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने केंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आघाडी सरकार बनविण्यासाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याच शक्यतेचा विचार करून विरोधक केंद्रात देखील कर्नाटक सारखा पॅटर्न राबवायच्या विचारात असल्याचे समजते. केंद्रात कुणालाच बहुमत मिळणार नसल्याची चर्चा यावेळी रंगत आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सत्तेत येण्यासाठी देशभरातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. १९८९ प्रमाणेच तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. पुढे ते गांधीची भेट घेऊन  लखनऊ येथे बसपा प्रमुख मायावती आणि सपा नेते अखिलेश यादव यांची देखील भेट घेणार  असल्याची माहिती आहे.त्याचबरोबर शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी  याविषयी चर्चा करणारा आहेत.

काय होता कर्नाटक फॉर्म्युला
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटक मध्ये भाजपला  सर्वात जास्त जागा मिळूनही आपला मुख्यमंत्री करता आला नव्हता. त्या ठिकाणी काँग्रेसने दोन नंबरच्या ज़ागा मिळवल्या होत्या. तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, ज्यादा सीट असूनही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा केला नव्हता. त्यांनी  जेडीएस ला पाठिंबा  देऊन  भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. अशाच प्रकारचा फॉर्म्युला वापरून  तिसरी आघाडी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.