आमदारांना जीवे मारण्याची धमकी, ‘दारुविक्रेत्यांच्या पोटावर लाथ मारु नका, नाहीतर…’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अवैध दारूविक्रेत्यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मिलन चौक परिसरात असलेल्या कार्यालयात हे पत्र येताच जोरगेवार यांनी जिल्हाधिकार्‍यांसह पोलिसात तक्रार केली आहे. धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर शहरात होणार्‍या दारू तस्करी बाबत काही महिन्यांपूर्वी जोरगेवार यांनी नाराजी दर्शवत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती होती त्यानंतर पोलिसांनी दारू तस्करी करणार्‍या अनेक मोठ्या आरोपींवर कारवाई केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर दारू तस्करीचे एक मोठे क्षेत्र गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना खुले झाले. दारू तस्करीतून मिळणारा मोठा फायदा आणि अतिशय कमी रिस्क यामुळे अनेक नवीन लोक धंद्याकडे आकर्षित झाली होती.

त्यानंतर दारू तस्करांवर झालेली कारवाई यामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावले गेल्यामुळेच आमदाराला जीवे मारण्याची धमकी देणारे हे पत्र लिहिण्यात आले असावे अशी शंका आहे. हे पत्र चंद्रपूर शहरातूनच पोस्ट करण्यात आल्याचा त्याच्यावर शिक्का आहे. विशेष म्हणजे या पत्रात दारू तस्कर हे गरीब आणि बेरोजगार असल्याचे म्हणत किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या पोटावर पाय देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे.