चांद्रयान-2 मोहिमेच्या संचालिका एम. वनिता यांना चांद्रयान-3 मधून ‘वगळलं’

पोलीसनामा ऑनलाईन : भारताच्या महत्वाच्या असणाऱ्या चांद्रयान-२ प्रकल्पाच्या संचालिका एम. वनिता यांना चांद्रयान-३ मोहिमेतून वगळण्यात आले आहे. तर वनिता यांच्या जागी पी. वीरामुथुवेल यांना या प्रकल्पच्या संचालकपदी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, चांद्रयान-२ मोहिमेत संचालकपदाची जबाबदारी असणाऱ्या रितू कारिधाल यांना चांद्रयान-३ मोहिमेतही कायम ठेवण्यात आले आहे.

इस्रोच्या २८ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकात एम.वनिता यांच्या बदलीची माहिती दिली. “एम.वनिता या एक उत्तम शास्त्रज्ञ असून त्या सध्या चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रकल्प संचालिका आहेत. त्यांची आता पीडीएमएसएच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्याऐवजी इस्रोच्या मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या पी. वीरामुथुवेल यांची चांद्रयान-३ च्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात येत आहे.” तसेच, पी. वीरामुथुवेल हे प्रकल्प व्यवस्थापन टीमचेही प्रमुख असणार आहेत. मिशनचे वेगवेगळे टप्पे लक्षात घेता इस्रोने प्रकल्प संचालकांबरोबर २९ उप प्रकल्प संचालकांची निवड केली आहे. ज्यांच्याकडे लँडर आणि रोव्हरची महत्वाची जबाबदारी असेल.

चांद्रयान-२ मोहिमेतील सर्व सिस्टीमची जबाबदारी एम. वनिता यांच्याकडे होती. याच सिस्टिमचा भाग असलेल्या विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरले होते. मात्र, इस्रोने वनिता यांची बदली करण्यामागे नेमके काय कारण आहे, हे इस्रोने अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही.

दरम्यान, चंद्रयान-२ या मोहिमेच्या वेळी सात सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. लँडरने सॉफ्टऐवजी हार्ड लँडिंग केले. चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या चौदा दिवसासमान असतो. त्यादृष्टीने लँडर आणि प्रग्यान रोव्हर १४ दिवस कार्यरत राहिल अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली होती. चांद्रयान-२ मोहिमेत फक्त लँडिंगमध्ये इस्रोला अपयश आले. या मोहिमेतील ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत असून तो पुढची काही वर्ष कार्यरत राहील अशी माहिती इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/