Google Drive च्या डेटा स्टोरेजमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लवकरच गुगल ड्राईव्हमध्ये मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत तुम्ही डिलीट केलेली फाईल ही गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह राहात असे. परंतु आता असं होणार नाही. आता जीमेलप्रमाणे गुगल ड्राईव्हमध्ये ट्रॅश म्हणजेच डिलीट केलेल्या फाईल्स या 30 दिवसांपर्यंतच सेव्ह राहतील. नंतर मात्र गुगल या फाईल्स डिलीट करणार आहे.

गुगलनं एका ब्लॉगद्वारे ड्राईव्हच्या या अपडेटबद्दल माहिती दिली आहे. गुगलनं म्हटलं आहे की, आम्ही 13 ऑक्टोबर 2020 पासून रिटेन्शन पॉलिसीत बदल करत आहोत. यानुसार ट्रॅश फोल्डरमध्ये असलेल्या कोणत्याही फाईल 30 दिवसांनी आपोआप डिलीट होतील. ही पॉलिसी जी सूट सोबत जीमेललाही लागू होईल.

आतापर्यंत गुगल ड्राईव्ह ट्रॅशमधील फाईल्स कायम सेव्ह रहात होत्या. परंतु 13 ऑक्टोबर पासून असं काहीही होणार नाही. ट्रॅशमधील तुमचा डेटा आता फक्त 30 दिवसांपर्यंतच सेव्ह राहणार आहे. यानंतर गुगल तुमचा हा डेटा डिलीट करणार आहे.

गुगलच्या मते या नव्या अपडेटचा फायदा युझर्सना होणार आहे. आता युझर्स केवळ त्याच फाईल्स डिलीट करतील ज्या त्यांना खरंच डिलीट करायच्या आहेत. आपल्या नव्या पॉलिसीबाबत गुगल एक बॅनरही दाखवणार आहे जेणेकरून युजर्स जागरूक होऊ शकतील.