स्वस्त धान्याच्या तस्करांकडून पत्रकारास बेदम मारहाण

एक तास पोलिस ठाण्यात फिर्यादीस बसवून ठेवले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – स्वस्त धान्याची तस्करी करणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या पत्रकाराला पाच जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, बूट व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. श्रीगोंदा शहरात ही घटना घडल्यानंतर जखमी अवस्थेतील पत्रकार फिर्याद देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गेला असता त्याला तब्बल एक तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार अदखलपात्र गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र दुखापत झाल्यामुळे पितळे यांनी वैद्यकीय उपचाराची मागणी केली. त्यानंतर मेडिकल रिपोर्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा श्रीगोंदा येथील पत्रकारांनी तीव्र निषेध करून तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मारहाणीत जितेंद्र कोंडीराम पितळे (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. नगर) हे जखमी झाले आहेत. ते एका साप्ताहिकाचे संपादक आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील शासकीय गोदामातून सार्वजनिक वितरणासाठी असलेल्या धान्याची तस्करी केली जात असल्याचे पितळे यांच्या लक्षात आले. म्हणून गुरुवारी रात्री नऊ वाजता ते सदर  टेम्पोचा पाठलाग करू लागले. पेडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे पितळे यांना रमेश झंजाडे, टेम्पोचा (क्र एमएच 16 एई 1195) चालक, मालक व इतर तीन अनोळखी व्यक्तींनी रात्री साडेनऊ वाजता त्यांना लाकडी दांडके, बूट व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पितळे यांना दुखापत झाली. कसातरी बचाव करून अंधाराचा फायदा घेऊन ते पळाले. त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. परंतु श्रीगोंदा पोलिसांनी पोलीस निरीक्षक आल्याशिवाय तुमची फिर्याद घेता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर एक तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी फिर्यादी पत्रकार जितेंद्र यांची चौकशी केली. त्यानंतर ठाणे अंमलदारास अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यास सांगितले.

ठाणे अंमलदारासमोर आल्यानंतर पितळे यांनी ‘मला दुखापत झाली आहे. मला वैद्यकीय उपचार घेऊन येऊ द्या. दुखापतीप्रमाणे गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी केली. त्यानंतर उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात जाण्यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला. वैद्यकीय उपचाराच्या प्रमाणपत्रानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमवून मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी रमेश झंजाडे व इतर अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तहसिलदार, पुरवठा अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे

पितळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘सदर आरोपींना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा.’ असा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या फाईलमध्ये पितळे यांनी केलेल्या तक्रारीचा उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रकारांकडून घटनेचा निषेध

दरम्यान, श्रीगोंदा शहरातील पत्रकार आणि सदर घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पोलीस अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी पत्रकार बाळासाहेब काकडे, अमोल गव्हाणे, शिवाजी साळुंके, उत्तम राऊत, दादा सोनवणे, अमोल उदमले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us