महिना 3 हजार परतावा देण्याचे आमिष दाखवत 22 जणांची फसवणूक; कंपनीच्या दोघांविरुद्ध FIR दाखल

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनी बंगलोर शाखा औरंगाबाद या कंपनीने तब्ब्ल २२ जणांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला २,६५० ते ३,१२५ रुपये देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केली आहे. याप्रकरणावरून रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीचे डायरेक्टर अयुब हुसेन व अनिस आयमन (रा. बंगलाेर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहित अशी की, बंगलाेर येथील रिदास इंडिया प्रॉपर्टीज या कंपनीने प्रति महिना २,६५० ते ३,१२५ रुपये नफा म्हणून परतावा मिळेल, अशी जाहिरात न्युज पेपरमधून केली हाेती. तसेच मूळ रक्‍कम परत पाहिजे असल्यास ४० दिवसात रक्‍कम परत दिले जाईल. तसेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रोडटच प्लॉट स्वस्त दरात मिळेल, असेही जाहिरातीत नमूद केले होते. तर बुलढाणा येथील म. साजीद अबुल हसन देशमुख यांनी या कंपनीमध्ये स्वत:चे व नातेवाईकांचे ११ लाख ५० हजार रुपये गुंतविले. नंतर या कंपनीने काही महिने परतावा व्यवस्थित दिला गेला. त्यानंतर कंपनीकडून परतावा देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली.

माे. साजीद यांनी हा सर्व प्रकार बघून बुलढाणा पाेलिस ठाण्यात तक्रार दिली असता त्या कंपनीतील दोघांवरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रिदास इंडिया प्रॉपर्टी कंपनी शाखा औरंगाबादच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.