राज्य मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी चेतन तुपे

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – राज्य मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe)यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची महाविकास आघाडी सरकारने नेमणूकीची घोषणा आज केली आहे. आघाडी सरकारने एक वर्षानंतर समितीची नेमणूक केली आहे. या समितीपैकी शिवसेनेच्या वाट्याला ७, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ४ आणि काँग्रेसच्या वाट्याला ५ समित्यांचे अध्यक्षपद आले आहे.

त्यातील मराठी भाषा समितीचे अध्यक्षपद चेतन तुपे यांच्याकडे देण्यात आले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून गेलेल्या चेतन तुपे यांच्याकडे या महत्वाच्या समितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राज्य सरकारसह विविध साहित्य संस्था व साहित्यिकांकडून मागणी केली आहे. ही मागणी पूर्णत्वाला नेण्याचे कामात महत्वाची भूमिका बजावण्याची संधी चेतन तुपे यांना यानिमित्ताने मिळू शकणार आहे. या समितीच्या अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा देण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत चेतन तुपे यांनी सांगितले की, प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विश्वासाने आपल्यावर येवडी मोठी जबाबदारी सोपविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाच्या इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मी ऋणी आहे. हा माझा नव्हे तर हडपसर विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांचा सन्मान असल्याचे मानतो.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिक नेहमीच विश्वासाने आणि ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे हे पद माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा सन्मान आहे, अशीच माझी दृढ भावना आहे. त्यामुळे हे पद मी त्यांच्याच प्रती समर्पित करतो. हडपसर मतदारसंघातील नागरिकांची मान कायमच उंचावलेली राहिल, अशी कामगिरी यापुढेही मी करीत राहीन, अशी ग्वाही देतो, असे त्यांनी सांगितले.