छत्तीसगडमध्ये युवकाकडून आईसह चौघांचा खून, हा काळया जादूचा खेळ असल्याचं पोलिसांनी सांगितलं

कोरबा/छत्तीसगड : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यामध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या आईसह तीन जणांचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोरमापासून 150 किलोमिटर अंतरावर असलेल्या परिसरात घडली आहे. पोलिसांनी काळ्या जादूसाठी हे कृत्य केले असल्याचे मत व्यक्त केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्री उशिरा सीतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीतील देवगड गावात घडली. याप्रकरणी आरोपी ईश्वर याला अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर याची आई राजकुवर (वय-60), शेजारी मनवासिया कंवर (वय-70), जब्बर साई कंवर (वय-80) आणि मोहन साई (वय-50) याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये चौघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नाही तर आरोपीने चौघांचा खून केल्यानंतर त्याच कुऱ्हाडीने सात कोंबड्या आणि दोन बैलांना जखमी केले.
पोलिसांवर आरोपीचा हल्ला

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घराची पाहणी केली त्यावेळी घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्य केल्याचे दिसून आले. तसेच फुले आणि गुलाल घरात पसरलेला दिसला. आरोपीने धार्मिक विधी केल्यानंतर चौघांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. प्रथमदर्शनी हे सर्व काळ्या जादूसाठी करण्यात आले असल्याचे दिसून येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, अद्याप खरे कारण समजू शकले नसून पोलिसांकडून याचा शोध घेतला जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.