‘निशा जिंदल’ बनून तरुणांची फसवणूक करणाऱ्याला अटक

रायपूर :  वृत्तसंस्था –   निशा जिंदल बनून 10 हजार लोकांना मूर्ख बनवणाऱ्या ठगाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. निशा जिंदल नावाच्या प्रोफाइलचे 10 हजार 590 फॉलोअर्स होते. पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आरोपीचे खरे नाव रवी पूजारी (वय-31) असून त्याने बनावट आयडीच्या माध्यमातून तो आक्षेपार्ह पोस्ट करत होता. ज्यावेळी निशा जिंदल ही तरुणी नसून तो रवी पुजारी असल्याचे समजल्यानंतर त्याच्या सर्व फॉलोअर्सला धक्का बसला.

पोलिसांनी रवी पुजारीला अटक करून त्याचा फोटो काढून तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच फेसबुकवर देखील हा फोटो व्हायरल करून त्यावर मी निशा जिंदल असून सध्या मी पोलीस कोठडीत असल्याचा मजकूरही पोलिसांनी पोस्ट केला. त्यामुळे त्याच्या फॉलोअर्सला धक्का बसला आहे. पोलिसांनी केलेल्या या करवाई बद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

रवी पुजारी हा स्वॉफ्टवेअर इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता. पण 2009 पासून त्याला प्रयत्न करूनही पदवी मिळवता आली नाही. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक आरोग्य संघटना जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असल्याची बातावणी करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱी आरिफ एच. खान यांनी दिली.

निशा जिंदल ही फेसबुकवर आक्षेपार्ह आणि जातीय तणाव वाढेल अशा पोस्ट करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केला. त्यानंतर निशा जिदंल नावाने रवी पूजारी फेसबुक अकाउंट चालवत असल्याचे समोर आले. रवी हा रायपूरमध्ये रहात असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली. या कारवाई पोलिसांनी लॉपटॉप आणि मोबाईल फोनही जप्त केले आहेत.