Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटात नाही करणार हल्ला, नक्षलवाद्यांनी केलं ‘सीजफायर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता नक्षलवाद्यांनीही शांततेसाठी पुढाकार घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांविरूद्धच्या लढाईत सीपीआय (माओवादी) यांनी आता युद्धबंदीचे आवाहन केले आहे. या ऑफरला प्रतिसाद देण्यासाठी ते पाच दिवस सरकारला देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी 21 मार्च रोजी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या 17 जवानांना ठार मारले होते.

हल्ला करणार नाही
पक्षाच्या लेटर हेडवर तेलगू भाषेतील हस्तलिखित पत्र प्रशायकीय अधिकाऱ्यांना मिळाले. हे पत्र सीपीआय (माओवादी) मलकानगिरी – कोरापुत-विशाखा बॉर्डर विभाग समितीचे सचिव कैलाशम यांनी लिहिले. ते म्हणाले की, कोविड – 19 मुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. आमच्या पक्षाच्या विंग पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी आणि इतर संघटनांनी निर्णय घेतला आहे की यावेळी सुरक्षा दलांवर कोणताही हल्ला होणार नाही. तसेच, या पत्रामध्ये कैलाशाने असे लिहिले की, या काळात सुरक्षा दलांनी कोणतीही कारवाई केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. अशा परिस्थितीत आपण गप्प बसणार नाही आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. या युद्धबंदीवर उत्तर देण्यासाठी आम्ही सरकारला पाच दिवस देत आहोत. मात्र, हे निवेदन पक्षाच्या कमांडने जारी केलेले नाही. अशा परिस्थितीत असे मानले जाते की नक्षलवाद्यांना सरकारचा हेतू जाणून घ्यायचा आहे कि, त्यांना असे प्रस्ताव मंजूर आहेत की नाही.

माओवाद्यांवर स्थानिक लोकांचा दबाव
माहितीनुसार, बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी म्हणाले की, माओवाद्यांवर स्थानिक लोकांचा दबाव आहे. माओवादी हे गावप्रमुख आणि काही विचारवंतांच्या संपर्कात असतात. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हिंसाचार झाल्यास आरोग्य कर्मचारी आणि सरकारी लोक गावात येणे शक्य नाही, यामुळे कोरोना गावात पसरल्यास थांबणे कठीण होईल.

सामाजिक कार्यकर्त्यांनी केले स्वागत
माओवाद्यांच्या या प्रस्तावाचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून केंद्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारला त्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले आहे. नागरी स्वातंत्र्य समिती तेलंगणा युनिटचे अध्यक्ष डॉ. गद्दाम लक्ष्मण आणि आंध्र प्रदेशचे अध्यक्ष व्ही. चित्तबाबू म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारांनी या आवाहनाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी जेणेकरून या क्षेत्रात शांतता कायम असेल.