मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थितीबद्दल कमलनाथांनी सोडले ‘मौन’, म्हणले – ‘चिंतेचं कारण नाही, बहुमत सिद्ध करणार’

ADV

भोपाळ : वृत्त संस्था – मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश काँग्रेस स्वत:चा बचाव करण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. यासाठीच मंगळवारी काँग्रेस आमदारांच्या गटाची बैठक झाली. या बैठकीत 100 आमदार सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. कमलनाथ यांनी दावा केला की, आमचे सरकार सुरक्षित आहे. आम्ही बहुमत सिद्ध करू.

मध्य प्रदेशातील राजकीय धुळवडीवर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मौन सोडून प्रथमच प्रतिक्रिया देताना म्हटले की, चिंता करण्याची आवश्यकता नाही, आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू. आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. तर दुसरीकडे काँग्रेस नेते मुकुल वासनिक, हरीश रावत आणि दीपक बाबरिया भोपाळमध्ये लवकरच दाखल होणार आहेत. ते सध्याच्या राजकीय संकटाचा आढावा घेणार आहेत. सूत्रांची अशीही माहिती आहे की, कमलनाथ नाराज आमदारांच्या घरवापसीचे प्रयत्न करणार आहेत.

ADV

कर्नाटकमध्ये असलेल्या नाराज आमादारांना समजावण्यासाठी कमलनाथ सज्जन सिंह वर्मा आणि गोविंद सिंह यांच्यासमवेत तीन लोकांना कर्नाटकला पाठवणार आहेत. यातील तिसरा दूत बिगर राजकीय असेल, असे समजते. दरम्यान, काँग्रेस नेत्या शोभा ओझा यांनी सांगितले की, आमदारांना सांगण्यात आले होते की, ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेचे तिकिट द्यायचे आहे, यासाठी तुम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी सही करा. अशाप्रकारे फसवणूक करून आमदारांचे राजीनामे घेण्यात आले.

मध्यप्रदेश विधानसभेत 230 जागा आहेत, ज्यामध्ये सध्या 2 रिक्त आहेत. अशाप्रकारे सध्या राज्यात एकुण 228 आमदार आहेत, ज्यामध्ये 114 काँग्रेस, 107 भाजपा, चार अपक्ष, दोन बहुजन समाज पार्टी आणि एका समाजवादी पार्टीच्या आमदाराचा समावेश आहे. कमलनाथ यांच्या नेतृत्वातील मध्यप्रदेशच्या काँग्रेस सरकारला या चार अपक्ष आमदारांसह बसपा आणि सपाचे सुद्धा समर्थन आहे. 22 आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची संख्या 92 होईल. तर राजीनामा देण्यार्‍या आमदारांचे सदस्यत्व गेल्यानंतर बहुमताचा आकडा 104 होईल.