मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे ‘मेट्रो’च्या कोचचे ‘अनावरण’, असा असणार मेट्रोचा ‘कोच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. पुणेकरांना प्रतिक्षा असलेली मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. आज पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मेट्रोच्या कोचचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम सह्याद्री अतिथिगृहात पार पडला. आता लवकरच पुणे मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. यावेळी नगरविकास मंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

असा असणार मेट्रोचा कोच
मेट्रोच्या कोचचे आगमन नागपूरमधून झाले आहे. या मेट्रोमध्ये प्रत्येक गाडीत तीन कोच असणार आहेत. एका गाडीतून 950 ते 970 प्रवासी एकाचवेळी प्रवास करु शकतील. या तीन कोच पैकी एक कोच महिलांसाठी राखीव असणार आहे. हे तीनही कोच आतून जोडलेले असतात. प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकतील. हे कोच स्टेनलेस स्टीलचे बनलेले असून वजनाने हलके आहे. त्यात अत्याधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत.

यात बाहेरील प्रकाशानुसार आतील दिव्याचा प्रकाश आपोआप कमी होईल. ताशी किमान 90 किलोमीटर वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल व लॅपटॉप चार्जिंगची सुविधा असेल. लवकरच हे कोच रुळावर चढवून यांची चाचणी घेण्यात येईल.

जून 2017 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षात आता मेट्रोची चाचणी घेण्यात येत आहे. मार्ग टाकणे, बांधकाम, सिग्नल व इतर कामे 30 महिन्याच्या विक्रमी काळात पूर्ण करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे कौतूक देखील केले. यावेळी महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम देखील उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/