CM उध्दव ठाकरे आज रात्री जनतेशी साधणार संवाद, मोठी घोषणा करण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) (आज) रविवारी (दि. 22) रात्री आठ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ठाकरे जनतेला संबोधित करताना राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, पुन्हा लॉकडाऊन की वीज बिल सवलतीबाबत मोठी घोषणा करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दिवाळीनंतर देशासह राज्यात कोरोनो रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिल्ली शहरामध्ये तर कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर मुंबईत सुद्धा कोरोनाचा आकडा दिवसेंदिव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा लॉकडाऊनबाबत भाष्य करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, शाळा पुन्हा सुरु करणे, वाढीव वीजबिलावर सवलत यांसह अनेक विषयांवर बोलणार असल्याची चर्चा आहे. मात्र, उद्धव ठाकरे नेमक कोणत्या विषयावर बोलणार आहेत, हे अद्याप गुलदस्यात आहे.

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचे काय होणार ?
दरम्यान, 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवल्या आहेत. तर नागपूर, पुण्यातसुध्दा कोरोनाची परिस्थिती वाढत असल्यामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बिल सवलतीबद्दल काही घोषणा करणार का?
तसेच गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा मनसेनेही दिला आहे. विशेष म्हणजे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलाच्या दरात सवलत देण्यास नकार दिल्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीज बिल सवलतीबद्दल काही घोषणा करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.