दुष्काळावर मुख्यमंत्र्यांचा फतवा : पालकमंत्र्यांनो मुंबई सोडा 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळून निघत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पालकमंत्र्यांना आपआपल्या जिल्हयात जाऊन राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी आणि इतर जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना बैठकांसाठी मुंबईला बोलवू नये असे मुख्यमंत्र्यांनी या आदेशात म्हणले आहे.

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यातील ८२ लाख शेतकऱ्या पर्यंत सरकारी मदत पोहचण्यासाठी  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंधारण, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागातील जिल्हा व तालुकास्तरावरील अभियंते आदी लोक आपआपल्या कामाच्या ठिकाणी हजर असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांना तुम्ही बैठकांसाठी मुंबईला पाचारण करून दुष्काळ मदत पुरवठ्याच्या कामात खंड पडू देऊ नका. तसेच पालकमंत्र्यांनी मुंबई सोडावी आणि आपल्या जिल्हयात दुष्काळ निवारणाच्या कामाची पाहणी करावी असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या फतव्यात म्हणले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांच्या नावे काढलेले पत्रिपत्रक मला मिळाले आहे. दुष्काळाच्या प्रश्नांवर जिल्हयात दौरे काढण्यास सुरुवात केली असून दुष्काळी कामांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे असे सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी म्हणले आहे.