बालविवाह…. नागपूरमध्ये मोठा अनर्थ टळला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये बालसंरक्षण कक्षाच्या पथकामुळे बालविवाह रोखण्यात आला. नागपूर जिल्ह्यात होत असलेला बालविवाह रोखण्यात पथकाला यश आले असून मागील सव्वा महिन्यात हा तीसरा बालविवाह रोखण्यात आला आहे. नागपूरमध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बालसंरक्षण कक्षाच्या पथकाने कामाठी येथील एका 14 वर्षाच्या मुलीचा विवाह 21 जुलै रोजी होणार होता तो रोखला आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असणे बंधनकारक आहे. असे असतानाही आजही बालविवाह होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. एकीकडे समाज सुधारला असे म्हटले जात असताना गेल्या महिनाभरातील हा तिसरा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मुलीच्या आई-वडीलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. मुलीचे वय 18 वर्षे होत नाही तोपर्यंत विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. लग्न झाल्यास बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार वर व वधूकडील मंडळींवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी प्रशासनाने दिला. दरम्यान 28 मे रोजी अशाच प्रकारे दोन अल्पवयीन मुलीचे विवाह रोखण्यात आले होते. आजची ही तिसरी घटना आहे.

ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या आदेशानुसार जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पाठण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, अनुप देशमुख, चाइल्ड लाइनच्या समन्वयिका छाया गुरव-राऊत, सारिका बारापत्रे, पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे, पंकज मारसिंगे, अंगणवाडी सेविका स्मृती दहाट, रंगराजन पिल्ली यांनी ही कारवाई केली. लॉकडाऊनच्या काळात नगरमध्ये 20 बालविवाह रोखले.

लॉकडाऊनच्या काळात 50 लोकांच्या उपस्थितीत आणि घरच्या घरी लग्न करण्यास सरकारने मुभा दिली. अर्थातच नाईलाजाने का होईना, याला समाजमान्यताही मिळाली. हीच संधी समजून अनेक गरीब वधूपित्यांनी कायद्याच्या अज्ञानातून तर कुठे नाइलाजातून आपल्या मुली उजविण्यास सुरुवात केल्याचे आढळून येत आहे. कारण एकट्या नगर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात जवळपास 20 बालविवाह चाइल्ड लाइनने रोखले आहेत. चाइल्ड लाइनच्या पथकाने शेवगाव, पारनेर, अकोले, पाथर्डी व नगर या पाच तालुक्यात प्रत्येकी एक बालविवाह रोखला आहे. बालविवाह लावून देण्याचे सर्वात जास्त प्रयत्न पाथर्डी तालुक्यात होत असल्याच आढळून येत आहे.