चिमुकल्यांनी रेखाटली ‘कोरोना’वर चित्र ! काळेपडळमधील डिलाईट सोसायटीमध्ये मुलांसाठी उपक्रम

पुणे – मुलांमधील अंगभूत कलागुणांना वाव देण्याची गरज आहे. आजची पिढी अत्यंत हुशार आणि नव्या गोष्टी तत्पर आत्मसात करत आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. सोसायटीतील नागरिकांनी मुलंसाठी राबविलेला चित्रकला स्पर्धा उपक्रम स्तुत्य आहे. चित्रकला स्पर्धेमध्ये मुलांनी कोरोना विषयावर चित्र रेखाटून कला सादर केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांनी व्यक्त केले.

हडपसर (काळेपडळ- पापडेवस्ती) येथील डिलाईट सोसायटीच्या वतीने 3 ते 13 वयोगटातील मुलांना विरंगुळा मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. ई लाईट सोसायटीमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुलांना विषय दिला होता. सोसायटीमधील नागरिकांसह मुलांनी तोंडाला मास्क लावून तसेच, सोशल डिस्टन्स्टिंग ठेवत चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. मागिल दोन महिन्यांपासून घरामध्ये दूरचित्रवाणी कार्यक्रम पाहिले, त्याचबरोबर पुस्तकांशी घट्ट मैत्रीही जमविली. त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्या, त्या अनुषंगाने कोरोनाविषयीची माहितीही त्यांना मिळाल्याचे दिसून आले. चित्रामध्ये स्वयंशिस्त, स्वच्छता यासह कोरोना विषाणूविषयी जागृती करणाऱ्या चित्राद्वारे उत्तम संदेश दिला. छोट्याशा चित्रकला स्पर्धेतून मुलांच्या कलागुणांनाही वाव मिळाल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले.