दुर्देवी ! वाहनाखाली चिरडून दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगली येथे मालवाहतूक करणाऱ्या वाहनाखालीच चिरडून एका दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. ही घटना वानलेसवाडी येथे दुपारी दीडच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात स्वराली सचिन आलदर (रा. धनगर गल्ली, वानलेसवाडी) असे मृत बालिकेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, दुर्देव म्हणजे स्वरालीचा मृत्यू तिच्या वडिलांच्याच वाहनाखाली झाला आहे. मात्र वाहनचालक वेगळा असल्याने त्याच्या दुर्लक्षामुळे मुलीचा प्राण गेला आहे. सुनील सरगर (वय २०, रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) हा वाहन चालवित होता, तर वडिल क्लिनरच्या बाजुला बसले होते. स्वरालीचे वडिल सचिन हे फळविक्रेते आहेत. दुपारी ते त्यांचे वाहन (क्र. एमएच १०, एक्यु ४०५३) घेऊन व्यापार करण्यासाठी निघाले होते. गाडी मागे घेत असताना चालक सुनीलने मागे कोणी आहे का हे पाहिले नाही. त्याने गाडी जोरात मागे घेतली आणि स्वराली चाकाखाली घावली.

दरम्यान, याघटनेवरून पोलीस ठाण्यात चालक सुनील सरगरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने स्वरालीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.