लडाखला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर चीनचा ‘जळफळाट’, भारतानं दिलं एकदम ‘ठासून’ उत्तर, घेतली ‘ही’ खंबीर भूमिका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संसदेच्या लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याच्या निर्णयाला चीनने विरोध केला आहे. चीन च्या या विरोधाला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेदेखील जशास तसे उत्तर देत जम्मू-काश्मीर विषयीचे विधेयक हा भारताचा अंतर्गत विषय असून यात न पडण्याचे सुनावले आहे. भारत अन्य देशांच्या अंतर्गत विषयांविषयी कोणतीही भूमिका घेत नाही किंवा टीका टिपण्णी करत नाही त्यामुळे तशीच अपेक्षा आम्हाला अन्य देशांकडूनही असल्याचे भारताने स्पष्टपणे सांगितले.

त्याचबरोबर भारत-चीन सीमेसंदर्भात प्रश्नांविषयी आपल्या दोनही पक्षांमध्ये एका योग्य आणि समाधानकारक निर्णयावर एकमत आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर पुनर्रचना २०१९ शी चीनचा कसलाही संबंध नसल्याने चीनने या घडामोडींमध्ये पडू नये असे देखील परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

काय म्हटले होते चिनी प्रवक्त्याने
भारताद्वारे लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा निर्णय घेतल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना चीनी प्रवक्त्याने म्हटले की,’भारताकडून दोन्ही देशांच्या सीमेवरील पश्चिमी भागांमध्ये असणाऱ्या चीन च्या प्रदेशाला भारताच्या प्रशासकीय क्षेत्राच्या नकाशात दाखविण्याला सातत्याने विरोध करत आला आहे. त्यातच आता भारताने आपल्या संविधानातील कायद्यामध्ये दुरुस्ती करून चीनच्या प्रादेशिक भूमीला धक्का लावला आहे. हे चुकीचे आणि अस्विकार्ह असून आम्ही भारताला सीमाविषयक प्रश्नांवर संविधानानुसार काम करून दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारांचे पालन करावे तसेच सीमाप्रश्न आणखी गुंतागुंतीचा न करण्याचे आवाहन करत आहोत.’

चीनच्या प्रवक्त्याने आज ६ ऑगस्ट रोजी असे वक्तव्य केल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेदेखील याला तात्काळ उत्तर दिल्याने भारताच्या खंबीर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.