‘ही केवळ ‘कोरोना’ची पहिली लाट, दीर्घ काळापर्यंत जगाला परिणाम भोगावे लागतील’ : चीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेकडून दबाव वाढल्यानंतर चीनने संपूर्ण जगाला नुकसान सहन करण्याची धमकी दिली आहे. चिनी सरकार नियंत्रित वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने मंगळवारी छापलेल्या संपादकीय लेखात म्हटले आहे की, अमेरिका सर्व मोठ्या देशांना चीनविरूद्ध उद्युक्त करत आहे आणि त्यांना आपल्या बाजूने करत आहे. याचा प्रतिकूल परिणाम होईल.

या वृत्तपत्राने म्हटले आहे की, अमेरिका आपला प्रभाव वाढवत आहे आणि जग त्याचे नुकसान भरपाई करेल. ज्या देशांशी चीनचा प्रादेशिक वाद आहे, त्या सर्व देशांना अमेरिका पाठिंबा देत आहे. अमेरिका पाश्चात्य देश तसेच आशियाई देशांनाही चीनचा विरोध करण्यासाठी उद्युक्त करत आहे.

चीनची बाजारपेठ अमेरिकेच्या बरोबरीची असल्याचे या वृत्तपत्रात म्हटले आहे. चीनचे जवळपास १०० देशांशी व्यापार संबंध आहेत, पण हे संबंध बिघडवण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे. दीर्घ काळ जगाला त्याची किंमत मोजावी लागेल.

ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे- ‘जगाला दीर्घकाळ नुकसान सहन करावे लागेल. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ रोगाची ही केवळ पहिली लाट आहे. महामारी वाढली असतानाही अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सहकार्य बंद केले आहे.’

चिनी वृत्तपत्राने लिहिले आहे की, असे दिसते की भूराजनीतिक संघर्ष आता मागील स्थितीकडे जाऊ शकत नाही. अमेरिका चीनविरूद्ध मोठी युक्ती करत आहे. यामुळे आगामी काळात द्वेष वाढू शकतो आणि युद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो. बर्‍याच देशांना याचे मोठे नुकसान होईल.