‘कोरोना’नंतर चीनमध्ये आता ‘ब्यूबानिक प्लेग’चा धोका, 2 रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल, अलर्ट जारी

बिजिंग : कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक घातक आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. उत्तर चीनच्या एका शहरात रविवारी ब्यूबानिक प्लेगचा एक संशयित रूग्ण सापडला आहे. यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनच्या सरकारी पीपल्स डेली ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, अंतर्गत मंगोलियन स्वायत्त क्षेत्र, बयन्नुरने प्लेगला रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी तिसर्‍या स्तरावरील सूचना जारी केली आहे.

ब्यूबानिक प्लेगचा संशयित रूग्ण बयन्नुरच्या एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी सापडला. स्थानिक आरोग्य प्राधिकरणाने घोषणा केली आहे की, सूचना 2020च्या अखेरपर्यंत लागू राहील. स्थानिक आरोग्य प्रधिकरणाने सांगितले की, सध्या शहरात मानवी प्लेगची महामारी पसरण्याचा धोका आहे. लोकांनी आत्मरक्षणासाठी जागृतता आणि क्षमता वाढवली पाहिजे. नागरिकांना असामान्य आरोग्य स्थितीत तातडीने माहिती दिली पाहिजे.

यापूर्वी सरकारी शिन्हुआ समाचार एजन्सीने 1 जुलैला म्हटले होते की, पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतात ब्यूबानिक प्लेगची दोन संशयित प्रकरणे समोर आली होती. त्यांना प्रयोगशाळेत दुजोरा मिळाला आहे. 27 व 17 वर्षांच्या दोन भावांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेने रिपोर्टमध्ये नव्या व्हायरसच्या धोक्याची माहिती दिली होती. या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, चायनामध्ये न्यू स्वाईन फ्लू नावाचा एक व्हायरस सापडला आहे, ज्यामध्ये महामारीची क्षमता आहे. संशोधकांनी सांगितले की, न्यू स्वाईन फ्लू जर मनुष्यात पसरला तर त्याचे दुष्परिणाम खुप वेगाने समोर येतात. हे संशोधन युएस सायन्स जर्नल्स पीएनएएसमध्ये प्रकाशित झाले होते. संशोधकांनी या व्हायरसला जी4 नाव दिले होते.

विशेष म्हणजे कोरोना व्हायरसने सर्वप्रथम चीनमध्येच जन्म घेतला आणि तेथेच विध्वंस केला. आता ही महामारी संपूर्ण जगात पसरली असून स्थिती खुपच बिघडलेली आहे. सध्या कोरोना संसर्गाची जगभरात 11,272,342 प्रकरणे समोर आली आहेत. तर 530,898 लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओनुसार, रविवारी मागील 24 तासात संसर्गाची 2,12,326 नवी प्रकरणे समोर आली आहेत. प्रथमच एवढ्या मोठ्याप्रमाणात प्रकरणे समोर आली आहेत.